Ahupe Camp 2023

 अहुप्याला जायच्या  उत्सुकतेमुळे झोप येत नव्हती. अखेर कॅम्पचा दिवस उजाडला. सकाळी ५ मे २०२३ ला बुद्ध पौर्णिमेच्या मुहूर्तावर आमचा काफिला घोडेगाव मार्गाने पुढे निघाला. डिंबे धरणामुळे धरण क्षेत्राच्या खालच्या भागात बर्‍याच गावांचा विकास झालेला दिसला. परिणामी ह्या भागातील गावांच गावपण हरवल्यासारखं वाटलं. अजूनही वातावरणात उकाडा होता. डिंबे धरणाला कम्प्लिट एक वेढा घातला, चारी बाजुंनी धरणाच्या पाण्यात सह्याद्रीच्या डोंगरांच नितळ आरशासारखं प्रतिबिंब पाहिलं.  


पेसा , दिगद गावे जशी लागली तसा वातावरणात एक गारवा जाणवू लागला. मातीचा रंग लालेलाल झाला आणि आम्ही अहुप्यात येऊन पोहोचलो.  अहुपे हे भीमाशंकर जवळचं घाटमाथ्यावरचं शेवटचं गाव!  भीमाशंकरप्रमाणेच हे गाव सदाहरित जंगलांच्या प्रकारात मोडते. ट्रान्स-सह्याद्रीचे प्रसाद पोतदार सर कॅम्पसाठी सह्याद्री पिंजून विलक्षण सुंदर जागा शोधून काढतात. 

  अहुपे सह्याद्रीच्या कुशीतलं एक गाव आहे. इथल्या आदिवासी पाड्यांमध्ये विकास आणि पर्यटनाची हवा अजूनही पोहोचलेली नव्हती. गावाचं गावपण शाबूत होतं. गावात शंकररावांच्या खळ्यातच आम्ही आमचं बस्तान बांधलं.  सरांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी आणि आम्ही आमचे तंबू स्वतःच्या हातांनी ठोकले. आमच्या बेस कॅम्पचा स्पॉट येवढा भारी होता की, आम्हाला जवळच म्हणजे अगदी बाल्कनीतच म्हणावा असा सह्याद्रीचा कडा काही अंतरावरच होता.




 जेवणं आवरून आम्ही आमच्या बाल्कनीतून 😊 दर्‍या खोर्‍यांच सृष्टी सौंदर्य अनुभवलं आणि त्याला लागुनच असलेल्या देवराईत गेलो. देवराईत जवळ जवळ ५० ते ६० फुट उंचीचे आदिवृक्ष आहेत. देवराईतील मंदिराजवळ शांत बसून सगळ्या मुलांना देवराईच्या संकल्पनेची ओळख करून दिली.  माकडं, वानरं आणि शेकरुंनी सुद्धा अगदी जवळून आम्हाला दर्शन दिले आणि ह्या संकल्पनेत भरच घातली. आज आमची बुद्धपौर्णिमा खर्‍या अर्थाने साजरी झाली. 



अचानक अंधारून आले आणि पाऊस सुरू झाला, तसा आम्ही भैरोबा मंदिराचा आश्रय घेतला.  वानरसेनेचा कळप मंदिराजवळ हजर झाला. मंदिराजवळील शिळांवरही ह्यांचीच प्रतिकृती काहीतरी खुणावत होती. 




मंदिरात प्रसाद सरांनी वेगवेगळ्या प्रकारच्या नॉट्स आणि गिअर्सची माहिती सांगून ह्या वेळेचा सदुपयोग केला. पाऊस ओसरल्यावर जवळच असलेल्या घोड नदीच्या उगम स्थानाजवळ आम्ही गेलो. वाटेत जंगलाच्या काळ्या मैनेच्या अनेक जाळ्या होत्या. ती बघुन आमच्यातली माकडं जागी झाली आणि आम्ही जाळीतील करवंदांचा फडशा उडवला. . जाळीतली काही करवंद अगदी गोल-टपोरी आणि चवीला गोड तर काही आकारने रग्बीच्या बॉल सारखी पण अगदी छोटी आणि आंबट😉. प्रत्येक झाडाची चव निराळी. पण काहीही म्हणा ,बाजारत येणारी शिळी करवंद खाण्यापेक्षा अशी स्वतःच्या हाताने तोडून खाण्याची मजा काही औरच आहे. कितीही खाल्ली तरी मनाचं समाधान  होईना. सगळ्यांची तोंड करवंदाच्या चिकाने चिकटायला लागली होती. नदी पात्रातील विहिरीच्या पाण्याने आम्ही  हात-पाय, तोंड स्वच्छ धुतले आणि घरी (शंकररावांच्या) पोहोचलो.

घोडनदी उगमाजवळील रांजणखळगे
करवंदांवर ताव




घोडनदी उगमाजवळील विहीर



 चुलीवरच्या जेवणावर सगळ्यांनी चांगलाच ताव मारला. कॅम्प मध्ये पंगतीत बसुन जेवणाची मज्जाच भारी असते. पत्रावळ्या देण्याची आणि पंगतीत वाढण्याची जबाबदारी मुलांनीच घेतली. घरी नाक मुरडत जेवणारे छोटे मोठे सगळेच सपाटून जेवले. पावसात भिजलेले आमचे टेंट कोरडे करून सगळे छान झोपलो. पुण्यात फॅन फुल केला तरी गर्मीमुळे कालपर्यंत झोप लागत नव्हती , आज थंडीमुळे कुडकुडलो, आणि जाड चादरी घेऊन झोपलो. 

सकाळी उठून टेंट उघडला, स्पष्ट काहीच दिसत नव्हतं, सगळ धुसरच दिसत होतं. डोळ्यांवर विश्वासच बसेना, हा सगळा धुक्याचा परिणाम आहे. कड्यातून धुक्याचे लोटच्या लोट येत होते. समोर असलेली व्यक्ती दिसणं अवघड झालं. 


 पहाटेच्या धुक्यात आम्ही देवराईच्या दिशेने प्रभात फेरी काढली. धुक्याच्या आणि पहाटेच्या जंगलाच्या वासाची अनुभुती मांडण्यासाठी लागणारा शब्दसाठाच नाहीये. पहाटेच्या ह्या सुगंधाने अंगात वेगळ्याच लहरी येत होत्या. दोन मिनीटं डोळे बंद करुन कानात शेकरु आणि इतर पक्ष्यांची किलबिल साठवण्याचा प्रयत्न केला. मनाला आवर घालून, तृप्त मनाने माघारी फिरलो.

सकाळची न्याहारी आवरून अहुपे गावाच्या द‍र्‍याखोर्‍यांचे दर्शन घेत आम्ही आश्रम शाळेजवळच्या एका टेकाडाजवळ येऊन थांबलो. काल सरांनी शिकवलेल्या वेगवेगळ्या नॉट्स आणि गिअर्सची आज प्रॅक्टिकल परीक्षा होती. काल सरांनी जी माहिती मंदिरात दिली होती. त्या ज्ञानाचा आज प्रथमच रॅपलिंग करणार्‍यांना संदर्भ कळाला आणि  कालच्या नॉट्सच्या सरावाचा आज सगळ्यांना फायदा झाला आणि नॉट्सचे महत्व  कळले. एक वेगळाच आत्मविश्वास वाढला हे करताना, लहान मोठ्या सगळयांनी ह्या  छोट्याश्या स्लोपवरुन सर्व नियम पाळून रॅपलिंग यशस्वी रित्या पार पाडले आणि आम्ही घरी परतलो. 



शंकररावांच्या घरासमोर अंगणात यत्र तत्र सर्वत्र हिरडा सुकवत ठेवला होता. नुकताच तोडून आणलेला, अर्धवट सुकलेला आणि पुर्ण सुकून मनुका झालेला असा प्रत्येक टप्यातला हिरडा घरासमोर जिकडे तिकडे पसरवून ठेवला होता. घरातली मोठी माणसं हिरडं येचायला जंगलात जायची आणि घरातली म्हातारी कोतारी आणि अगदी लहान लहान मुलं सुद्धा हिरडं सुकवण्याच्या कामात मग्न असायची. पावसाळ्यात तांदुळ आणि उन्हाळ्यात हिरडा हे दोनच इथल्या स्थानिक लोकांचे उत्पनांचे स्त्रोत आहेत ही माहिती मिळाली. यंदाच्या हवामानबदलाची झळ इथेही पोहोचली होती. परिणामी आंबे आणि हिरड्याच्या पिकावर फटका बसला होता.






मुलांना करवंद, ज्या द्रोणात करवंद खाल्ली ते चांदाडाचे वृक्ष, आळु,  हिरडा, अंजनी अश्या नेमक्या वृक्षांची तोंडओळख झाली. इथले साधेसुधे लोकजीवन, इथला झाड झाडोरा व त्याचा इथल्या लोकांशी असलेला सबंध आम्ही मुलांसोबत पाहिला आणि अनुभवला. दुपारच्या जेवणानंतर आम्ही सगळे लहानमुलांबरोबर ह्याच गप्पा मारत बसलो. आणि ह्या गप्पांमध्ये असे लक्षात आले की सर्व मुलांचे अश्या सहलींमधूनच पर्यावरणीय शिक्षण आपोआप घडत असते. 

उद्या आम्ही अहुपेच्या घाटातून खाली कोकणात उतरणार होतो. पहाटे लवकर उठून आश्रम शाळेजवळून अहुपे घाटाच्या दिशेने कुच केले. एका बाजूला सह्याद्रीची भिंत आणि दुसर्‍या बाजूने गर्द झाडींमुळे ह्या घळीत प्रकाशाची कमतरता होती. लाखो वर्षांआधी सह्याद्रीची ही भींत ज्वालामुखींच्या उद्रेकातुन कशी थराथरांनी बनली असेल उतरताना ह्याचाच विचार करत होतो. कातळाच्या निसर्गतः निर्माण झालेल्या पायर्‍या आणि पालापाचोळा तुडवत आम्ही खाली उतरत होतो. 



अचानक काळोख वाढला आणि पाऊस सुरु झाला. तरीही झाडांचा आडोसा घेत थोडंसं भिजत आम्ही पुढे जाण्याचा निर्णय घेतला. गोरक्षगड आणि मश्चिंद्रगड आता आम्हाला जवळ आल्यासारखा वाटला. खालचं खोपिवली गाव स्पष्ट दिसू लागलं होतं. 

पण आता पावसाने पायाखालची वाट बरीच निसरडी झाली होती. जवळ जवळ दीड तास चालून आम्ही अंतर कापलं होतं तरीही अजून अर्धा घाट उतरायचा बाकी होता. सगळ्यांना घाट उतरायची इच्छा होती. पण पाऊस वाढत होता, त्यामुळे  घळीतून खाली जाणे जरा धोक्याचे वाटले. सरांनी माघारी फिरण्याचा निर्णय घेतला,  ह्या बदल्यात भट्टीचे रान दाखवतो असे सांगितले. अर्धा घाट तर आम्ही अनुभवला होता, आणि अजून एक ट्रेक ही ऑफर फायद्याची वाटली. गोरक्षगड आणि मच्छिंद्रगडाला नमस्कार करून घाट अर्ध्यातूनच माघारी चढायला लागलो. घाट चढता चढता शंकरराव इथल्या झाडोर्‍याची माहिती देत होते. संपुर्ण घाट उतरायला त्यांना जिथे केवळ अर्धा तास लागतो तिथे आम्हाला तीन एक तास लागले असते असे त्यांनी सांगितले. खाली कोकणात रहाणार्‍या नातेवाईकांसाठी डोक्यावर २५ किलो धान्याच पोतं घेऊन बर्‍याच वेळा शंकररावांच्या फेर्‍या ह्या मार्गाने होत असतात. आपण कोकणात जाण्यासाठी भुयारातून जाणारा एक्सप्रेसवे वापरतो, पण फार पुर्वी पासून देश अणि कोकणाला जोडणार्‍या ह्या घाटवाटांचा दळणवळणासाठी स्थानिकांना उपयोग होत असेल. पण तरीही ह्या घाटाच्या सृष्टीसौंदर्याला गालबोट लागले नव्हते. घाट चढून वर आलो, इथे मात्र पावसाच्या खुणा दिसल्या नाही. पाऊस फक्त खालच्या घळीतच होता. कड्यावरून खाली कोकण ढगात गाढल्यासारखं दिसत होतं. सह्याद्रीच्या उभ्या भिंतींने हा सगळा पाऊस अडवून ठेवला होता. काहीही म्हणा पण आम्हाला भर उन्हाळ्यात मान्सुन ट्रेक अनुभवायला मिळाला. 





सरांनी केलेल्या आश्वासनाप्रमाने आम्ही भट्टीच्या रानाच्या दिशेने जायला निघालो. भीमाशंकरच्या दिशेने जाणारा हा ट्रेक दोन्ही बाजूंनी वेढलेल्या घनदाट अभयारण्यातून जात होता. जंगलात झाडांच्या सावलीत, दगडांच्या कपारीत चंदेरी नेचे दिसत होते. सर्व झाडांच्या खोडावर असणारे मडगजे (मॉस) आणि हे चंदेरी नेचे इथल्या जंगलाची आर्द्रता दर्शवते. ह्यामुळेच घनदाट जंगलातून भर उन्हात चालतानाही आम्हाला उन्हाचा त्रास होत नव्हता. करप, लेंढी जांभळांसारखे दिसणारे करांबो, खाजखुईलीचा वेल, माकडलिंबू असे वृक्ष बघत आम्ही चढत होतो. कारवीच्या उंचउंच रानाला पार करून आम्ही माथ्यावर येवून पोहोचलो. सरांनी खाली कोकणात असलेली कर्जत आणि कल्याण शेजारील गावे आणि तिथे पोहोचण्यासाठी असणार्‍या वाटांची ओळख करून दिली. शंकररावांनी खाली असलेली काही दगडी चौथरे दाखवले. शिवाजी महाराजांच्या काळात त्या चौथर्‍याजवळ चुन्याची भट्टी होती. गड बांधताना दगड, वाळू आणि हा चुना वापरून गड बांधले जायचे. चुन्याची ही भट्टी ह्या कड्यावरून दिसते म्हणून ह्या भागाला भट्टीचे रान म्हणतात अशी माहिती शंकररावांनी दिली. 












दुपारी आम्ही घरी पोहोचलो, भटकून मोठ्यांच्या पायांची लाकडं झाली होती, पण ट्रान्सच्या बच्चे कंपनीची एनर्जी अजूनही बाकी होती. सगळी लहान मुल जेवल्यावर थोड्यावेळाने सरांबरोबर विहिरीच्या पाण्याने आंघोळीला गेली. आम्ही मात्र अंगणात चटई अंथरून वामकुक्षीचा आस्वाद घेतला. 


सरांनी आमच्यात दोन गट केले होते . एक गोरक्षगड आणि एक मच्छिंद्रगड! रोज भटकंती तर होतच होती, त्याचबरोबर दररोज दुपारी देवराई जवळच्या मैदानात किंवा टेंट मागच्या विस्तीर्ण हिरड्याच्या सावलीखाली अ‍ॅडवेंचर्स गेम्सची चुरस लागत होती. शंकररावांच्या घरची समृद्धी सुद्धा ह्या खेळात शामील होत असे. कधी रायफल शुटिंग, तर कधी ट्रेझर हंट, डोळे मिटून आमच्या बॅलन्सची परीक्षा घेणारा क्लिपींग अनक्लिपींगचा खेळ,  आणि कधी लॅडर क्रोसिंगचा खेळ आम्ही खेळलो. कधी गप्पा तर कधी विनोदी नाटकं, तर कोणी गाणी प्रस्तुत करत असे. दररोज तिन्ही सांजेला सुर्यास्ताचे दर्शन घेण्यासाठी आमच्या लाडक्या सनसेट पॉइंटला जाऊन आम्ही समाधी लावायचो. गोरक्षगड आणि मच्छिंद्रगडच्या बरोबर बेचक्यात सुर्याचा भगवा गोळा लुप्त होत असे. 

जेवल्यानंतर रात्री मॅडम कधी लाढीकाठीचा चीरवार आणि शीरवार शिकवत. तर कधी भविष्यात काय बनायचंय ह्याच्या गप्पा रंगत असत. बुद्धपौर्णिमा होऊन गेल्यामुळे रोज आम्हाला लालबुंद चंद्रोदयाचे दर्शन होत होते. असा अद्वितीय चंद्रोदय आम्ही पहिल्यांदाच अनुभवत होतो. सरांनी सगळ्या मुलांमध्ये खगोलशास्त्राची गोडी लागावी म्हणुन टेलिस्कोपही आणला  होता, आम्ही तो नेमका शेवटच्या दिवशी बघण्याचा प्लॅन केला,पण त्यादिवशी ढगांमुळे आमचा प्लॅन फिसकटला. शेवटी शेवटी सगळ्या मुलांची छान गट्टी जमली होती. रात्री उशीरा पर्यंत सगळ्यांच्या गाणी गप्पा येवढ्या रंगत असत, की ह्या नादात दिवसभर हिंडूनही मुलांना झोपायची इच्छा नसे.











 प्रत्येक मुलांमध्ये वेगळ्या कला दिसत होत्या. विहानचे खगोल/ भुगोल प्रेम, अनिषचे पक्षी प्रेम, ऎशानीच्या कविता, वैष्णवीचे किडे, दगड आणि खेकड्यांचे प्रेम, रिआंशची स्टॅंडअप कॉमेडी, नीलयची सगळ्यांना चिअरअप करण्याची एनर्जी, अवनी/ सोहीनीची सरांना मदत करण्याची तत्परता, तर सुर्हुदाची तब्बेत बिघडली असूनही तिने मॅडमवर टाकलेल्या विश्वासामुळे स्वतःच्या वाढवलेल्या क्षमता, पायांचे दुखणे असुनही निसर्गप्रेमापोटी सगळ्या अ‍ॅक्टीविटीमध्ये भाग घेणार्‍या नेहाताई. असे सगळ्यांचे विवीध रंग दिसून येत होते,आणि सर्वात जास्त मी कोणाच्या  आवडीचा ह्या लव ट्रॅंगल मध्ये अडकलेलं आमचं करवंद प्रेम! सगळ्यांमुळे हा कॅम्प आमच्या कायम लक्षात राहील 



ती देवराई, भैरोबाचं मंदिर, तो सह्याद्रीचा कडा, आमचं लाडकं हिरड्याचं झाड,  शंकररावांचा परिवार सगळ्यांना मनापासुन निरोप देत आम्ही जड पावलांनी परतत होतो.











 घोडेगावच्या पुढे आलो तसे होणार्‍या गर्मीमुळे आपण पुनः आपल्या आधुनिक मानव निर्मीत जीवनात परतल्याच्या जाणिवा झाल्या. माणसांच्या सुखसोयींसाठीच खर तर हे कातळ फोडून केलेले हायवे आहेत, पण तरीही इथे आल्यावर सुख हरवल्यासारखं वाटतं. भीमाशंकरच्या नव्हे तर  शहराच्या खर्‍या खुर्‍या भट्टीच्या रानात आम्ही परतलो. 


नीलम कर्ले

ट्रान्स सह्याद्री स्वयंसेवक.







Comments